सावित्रीबाई फुले निबंध मराठी | Savitribai phule marathi nibandh  :

सावित्रीबाई-फुले-निबंध-मराठी
सावित्रीबाई-फुले-निबंध-मराठी

सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षक होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य शिक्षण प्रसार व समाज सुधारणेच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली सावित्रीबाईंचा विवाह जोतीराव फुले यांच्यासह झाला. तेव्हा त्यांचे वय अवघे ९ वर्ष तर जोतीरावांचे वय तेरा वर्षाचे होते. जोतिबांनी सावित्रीबाईना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.स्त्रियांना दुय्यम दर्जा देणाऱ्या समाजव्यस्थेला न जमानता सावित्रीबाईनी स्त्रीमुक्ती व स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. 

१ जानेवारी १८४८ ला त्यांनी त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह पहिली मुलींची शाळा सुरु केली. स्त्रियांनी शिकणे व शिकविणे हे धर्माला अनुसरून नाही असे काही लोकांना वाटे, अशा लोकांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला. सावित्रीबाई शाळेत जायला निघाल्या की हे विरोधक त्यांच्यावर दगड, शेण, व चिखल फेकत. पण सावित्रीबाईनी या सगळ्याला खंबीरपणे तोंड दिले. बाल विवाह, सती, केशवपन अशा कित्येक क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यांनी हातभार लावला. त्यांनी अनेक ठिकाणी समाजसुधारणेसाठी भाषणे दिली. सावित्रीबाईनी 'काव्यफुले' व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हे काव्य संग्रह लिहिले.१८९६-९७ सालांदरम्यान पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. सावित्रीबाई प्लेगच्या रोग्यांची सेवा करीत होत्या, तेव्हा त्यांनाही प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ साली प्लेगमुळे त्यांचे निधन झाले.